नवी मुंबई : एपीएमसीमधील खासगी कंपनीच्या कार्यालयाच्या इमारतीला सोमवारी रात्री आग लागली. आगीमध्ये दोन मजली इमारत जळून खाक झाली असून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. कार्यालय बंद असताना ही घटना घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.एपीएमसी सेक्टर १८ येथील आयर्न एक्सचेंज हाऊस या खासगी कंपनीच्या दोन मजली इमारतीमध्ये आग लागली. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होवून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर आगीमुळे त्याठिकाणच्या एसीचे स्फोट होवून आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझवण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. सदर कार्यालय संध्याकाळी ६ वाजता बंद झाले होते. त्यामुळे आगीच्या घटनेवेळी कार्यालयात कोणी नव्हते, असे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. यामुळे त्याठिकाणची संभाव्य जीवितहानी टळली. (प्रतिनिधी)
एपीएमसीमध्ये कार्यालयाला भीषण आग
By admin | Published: June 29, 2016 2:10 AM