अनगाव : भिवंडी तालुक्यातील अनगाव गावाजवळ असलेल्या पितांबरी कंपनीच्या कारखान्याला रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. या कारखान्यात उदबत्ती आणि तिळापासून तेल काढण्यात येते. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मालकीची ही कंपनी आहे. दरम्यान, कंपनीचे अधिकारी उपस्थित नसल्याने घटनेची माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.अनगाव गावाजवळ फोरशाचापाडा या आदिवासी पाड्याजवळ पितांबरी कंपनी आहे. या कंपनीत उदबत्ती तयार केली जाते. तसेच दुसऱ्या विभागात तिळापासून तेल काढले जाते. उदबत्ती तयार करण्यासाठी लागणारे रसायन व तेलाच्या टाक्या आहेत कारखान्यात आहेत. रविवारी अचानक आग लागली. सुटी असल्याने कामगार कुणीही नव्हते. आगीत मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. या कंपनीत दीडशे महिला व पन्नास पुरुष कामगार कामाला आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीत वेल्डींगचे काम सुरू असताना त्याची ठिणगी पडल्याने आग लागल्याची माहिती तेथील कामगार व प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र तेथे असलेल्या तेलाच्या तीन टाक्यांनी पेट घेतला. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी एस. पवार यांनी दिली. ग्रामीण भागात लोकवस्तीजवळ अशा रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)आग कशाने लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीचे मालक किंवा व्यवस्थापक उपस्थित नसल्याने योग्य माहिती मिळत नाही. सोमवारी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार आहे.- डी. एस. खेडेकर, मंडळ अधिकारी.
पितांबरी कंपनीला आग
By admin | Published: February 20, 2017 3:46 AM