मुंबई - कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवाच्या आठवणी ताज्या असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. अंधेरीतील मरोळ परिसरातील रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य 7 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मरोळ परिसरातील मैमून नावाच्या रहिवासी इमारतीच्या तिस-या मजल्यावर ही दुर्घटना घडली आहे. मोईन कपासी (वय 80 वर्ष), तस्लीम कपासी (वय 42 वर्ष), सकीना कपासी (वय 13 वर्ष) , मोईज कपासी (वय 8 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना कुपर व मुकुंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली आहे, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर कपासी कुटुंबीयांपैकी एक जण घरातून बाहेर पडला. यावेळी घराचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य घरातच अडकून पडले. आगीची तीव्रता वाढू लागल्यानंतर हे सर्वजण घराच्या खिडकीपाशी आले. येथून ते तब्बल अर्धा तास मदतीसाठी आक्रोश करत होते. मात्र, खिडकीला असलेल्या लोखंडी जाळीमुळे नागरिकांना त्यांना मदत करता आली नाही आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.
तर दुसरीकडे, अग्निशमन दल घटनास्थळी उशीरा पोहोचल्यानं चार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अग्निशमन दलानं आरोप फेटाळून लावत, इमारतीकडे जाण्यासाठीची वाट खूपच अरूंद असल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या आठवड्यात लोअर परेल परिसरातील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री उशिरा 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.