सोमनाथ खताळ , जालनादुर्देवाने एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले आहेत. परंतु शासकीय कार्यालयातील हे यंत्र म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. याबाबत कार्यालये अनभिज्ञ असून जेव्हा आग लागेल, तेव्हाच जाग येईल, अशी परिस्थिती बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघडकीस आली.शासकीय कार्यालयांत आग लागल्यास महत्वाचे दस्तोेवज आगीत खाक होण्याची दाट शक्यता असते. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यालयात प्राथमिक उपाय म्हणून अग्निशमन यंत्र असावे, असे आदेश दिले होते. हाच धागा पकडून जालना शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रांची काय परिस्थिती आहे? याचा आढावा घेतला असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.शहरातील अग्निशमन दल, वन परिक्षेत्र कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफीस, नगर परिषद, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांची पाहणी केली असता, काही कार्यालयांमध्ये हे अग्निशमन यंत्र धूळ खात पडल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी केवळ शोभेची वास्तू म्हणून हे यंत्र भिंतीला लटकवण्यात आले होते.ना तपासणी, ना कारवाईहे यंत्र कार्यान्वित आहेत का? त्यांची परिस्थिती कशी आहे? याबाबत तपासणी करण्यास संबंधितांना वेळच नसल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई करणे तर दूरच. यामुळेच शासकीय कार्यालयातील महत्वाचे दस्तावेज व कागदपत्रे धोक्यात आहेत.वन परिक्षेत्र कार्यालयाने झटकले हातयेथील कार्यालयात अग्निशमन यंत्र नसल्याचे वनक्षेत्र अधिकारी एम.आर.निकुंभ यांनी सांगितले. विशेष म्हणजे आपण मागणी केलेली नाही. यावरून हे कार्यालय आगीबाबत किती जागरूक आहे, हे यावरून स्पष्ट होते. इतरांचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती.
लागेल आग; तेव्हा येईल जाग
By admin | Published: July 28, 2016 12:29 AM