घोटी (नाशिक)- मुंबई आग्रा महामार्गावर घोटीजवळ असणाऱ्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाच्या पेट्रोलच्या टाकीला आज अचानक आग लागली. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.घोटीजवळ असलेल्या इंडियन ऑईलच्या नटराज पेट्रोल पंपावर असणाऱ्या वीस हजार लिटर क्षमतेच्या भूमिगत पेट्रोलच्या टाकीचे स्वच्छतेचे काम तीन कामगार करीत होते. या टाकीत तळाशी थोडे पेट्रोल शिल्लक असल्याने ते काढण्याचे काम कामगार करीत होते. यावेळी टाकीजवळून गेलेल्या विद्युत केबलचे शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केले. ही बाब पंपावरील कामगाराच्या लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला व घोटी टोल नाका आणि इगतपुरी नगरपरिषद च्या अग्निशामक यंत्रणेला कळविण्यात आले.दरम्यान या घटनेची माहिती घोटी पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, कर्मचारी धर्मराज पारधी, सुहास गोसावी आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिकमध्ये पेट्रोलपंपाच्या टाकीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:12 PM