संतोष मगर, तामलवाडी (ता. तुळजापूर)तुळजापूर-सोलापूर महामार्गापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले जळकोटवाडी (ता. तुळजापूर) हे गाव द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध. मात्र, गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शंभर एकरावरील द्राक्षबागांचे अक्षरश: सरपण झाले आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.जळकोटवाडीकरांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. ज्वारी, हरभरा गहू या पिकांसोबतच येथे फळबागांचे क्षेत्रही मोठे आहे. मात्र, गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतीव्यवसाय धोक्यात आला. काही बागायतदार बाहेरगावाहून टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत असले तरी जवळपास शंभर एकरावरील बागा पूर्णत: वाया गेल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी या बागा मोडण्यास सुरुवातही केली आहे.गावचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी सहा वर्षांपूर्वी येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, यातील विहीर व पाइपलाइनचे काम मार्गी लागले असले तरी, टाकीचे बांधकाम रखडले. सध्या गावातील विंधन विहिरींनीही तळ गाठला असून चार दिवसांनी अर्धा तास विद्युत पंप चालत असल्याने ते पाणी जिल्हा परिषद शाळेजवळील पुरातन आडात सोडण्यात येते. गावकरी येथून घागरीने हे पाणी उपसून तहान भागवितात. गावात चार हातपंप असले तरी त्यातील तीन हातपंप कोरडे आहेत. शिवाय २०५ विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. > गावात लहान-मोठी अशी ७८० जनावरे असून, महिनाभर पुरेल एवढा चारा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्यासोबतच चाराटंचाईचादेखील सामना करावा लागणार आहे. कामाअभावी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र येथे दिसते. जळकोटवाडीत जवळपास दोनशे मजूर असून, यातील ११३ जणांकडे जॉबकार्ड आहे. परंतु, हाताला काम नाही. गावात नवीन विहीर, शेतरस्ते यांचे प्रस्ताव पाठविले असले तरी त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने या मजुरांवर कामासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे गावात कोणतेही बांधकाम न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विहिरीतील पाणीसाठा कमी झाला असल्याने चार दिवसांआड उपसा करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्याचे सरपंच राजाभाऊ फंड यांनी सांगितले.अत्यल्प पावसामुळे दोन महिन्यांपूर्वीच विहिरी आटल्या. त्यामुळे हाताशी आलेल्या द्राक्षबागा वाळून गेल्या. जनावरे, फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान या दुष्काळाने उभे केले आहे. मन घट्ट करून वाळलेल्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागत असल्याची खंत शेतकरी रामचंद्र बोबडे यांनी व्यक्त केली. गावासाठी स्वतंत्र जलस्रोत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शंभर एकरावरील बागांचे सरपण
By admin | Published: April 22, 2016 4:11 AM