ऑनलाइन लोकमत
राजगुरुनगर(पुणे), दि. 15 - शिरोली येथे प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार करण्यात आला असून यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. काजल लक्ष्मण शिंदे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी कृष्णा राजपूत ऊर्फ विजयकुमार जठार याला पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
शिरोली येथे एका तरुणीवर गोळीबार एका तरुणाने गोळीबार केला आहे. काजल शिंदे (वय १७, रा. शिरोली. ता. खेड) असे तरुणीचे नाव आहे, तर गोळीबार करणा-या मुलाचे नाव विजयकुमार जठार ऊर्फ कृष्णा राजपूत (वय २५, रा. चाकण) असे आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. आज सकाळी काजल ही दूध आणि साखर घरी घेऊन जात होती. या वेळी काजलला प्रियकर कुष्णा हा हाका मारीत तिच्या पाठीमागे येत होता. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. दरम्यान कृष्णाने तिचा उजवा हात पकडून छातीवर पिस्तुल ठेवून ‘माझ्याबरोबर चल’ असे सांगितले. काजलने त्याला नकार देताच तिच्या छातीवर गोळी झाडली. ही गोळी छातीत गेल्यामुळे काजल जागीच कोसळली. दरम्यान काजलने आरोडाआरोडा केल्यानंतर तिचे दोघे भाऊ पळत आले. हल्लेखोर कुष्णा रजपूत याने तिथून पळ काढला. गोळीबारात काजल ही गंभीर जखमी झाली असल्याने तिला तत्काळ खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. कृष्णा रजपूत पळून जात असताना चाकण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रजपूतला ताब्यात घेतले. खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, जयश्री देसाई, खेड पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी गोळीबारात जखमी झालेल्या काजलची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. खेड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
काजल आणि कृष्णाचे काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. काजल शिंदे ही अगोदर चाकण येथे कुटुंबासमवेत राहत होती; मात्र काही कारणामुळे शिरोली (ता. खेड) येथे राहण्यास आली होती.