मांडवा (जि.बीड) : दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या व गेल्या काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर सुटलेल्या कैद्याने सासूवर गोळीबार केला. सासूने गोळी चुकविल्याने या हल्ल्यातून वाचली. ही थरारक घटना रविवारी मध्यरात्री दादाहरी वडगाव येथील धाब्यावर घडली. तानाजी भोसले असे त्या कैद्याचे नाव आहे. गोळीबार केल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीसमवेत तो दुचाकीवरून पळून गेला. त्याची सासू शिवशला शेषेराव इंगळे ही भयभीत आहे. शिवशला यांची मुलगी सुनीता हिचा आठ वर्षांपूर्वी तानाजी भोसले याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यांत तानाजी अडकला. त्यानंतर त्याला अटक झाली. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्याला शिक्षा झाली होती. अमरावती येथील कारागृहात तो शिक्षा भोगत होता. दरम्यान, पती कारागृहात असल्याने सुनीता आपल्या दोन मुलांसह माहेरी राहत होती. काही दिवसांपूर्वी तानाजी पॅरोलवर बाहेर आला. रविवारी तो दादाहरी वडगाव येथे आला. त्याची सासू शिवशला ही गावातीलच एका ढाब्यावर स्वयंपाकाचे काम करते. ती स्वयंपाकासाठी ढाब्यावर गेल्यानंतर पाठोपाठ तानाजीदेखील तेथे पोहोचला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने स्वत:जवळील पिस्तूलने सासू शिवशलाच्या दिशेने निशाना धरला. एक गोळी झाडली, पण शिवशला यांनी ती चुकविली. त्यानंतर शिवशला यांनी आरडाओरड केली. तानाजी भोसले साथीदारासोबत दुचाकीवरून पळून गेला. (वार्ताहर)
पॅरोलवर सुटलेल्या कैद्याचा सासूवर गोळीबार
By admin | Published: May 05, 2015 1:10 AM