पिंपरी : संभाजीनगर (चिंचवड) येथील ठाणे जनता सहकारी बँकेच्या (टीजेएसबी) आवारात मंगळवारी भरदुपारी रोकड पळविण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने रखवालदारावर गोळीबार केला. रखवालदाराने प्रतिकार केल्याने सुमारे ४० लाख रुपये भरलेली बॅग तिथेच सोडून चोरटा पसार झाला. या झटापटीत गोळी खांद्याला लागल्याने कपिल रॉय (४६) हा रखवालदार जखमी झाला. बँकेतील कॅश काउंटरवर जमा झालेली रक्कम तळमजल्यावरील स्ट्राँगरूममध्ये नेताना बाहेरच्या बाजूस दबा धरून बसलेल्या चोरट्याने रखवालदार रॉय, तसेच गणपत दसाडे यांना धक्का दिला. रोखपाल नीलेश लवंगे यांच्या हातातील रोख रकमेची सुटकेस हिसकावली. त्या वेळी प्रसंगावधान राखून रखवालदार रॉय यांनी चोरट्याला अडवण्याचा प्रयत्न केला. रॉय प्रतिकार करू लागल्यामुळे, चोरट्याने पिस्तूल काढून त्यांच्यावर गोळी झाडली. ती रॉय यांच्या डाव्या खांद्याला लागली. चोरटा पायऱ्या चढून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, बाजूच्या रेलिंगला बॅग धडकली. त्या धडकेने बॅग उघडली गेली आणि नोटांची बंडल खाली पडली. तोपर्यंत बॅँकेतील इतर कर्मचारी बाहेर आले. बंडल उचलण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चोरट्याला दसाडे यांनी वीट फेकून मारली. मात्र, तोपर्यंत दुचाकीवरून चोरटा पसार झाला. (प्रतिनिधी)
ठाणे जनता बँकेच्या आवारात गोळीबार
By admin | Published: November 18, 2015 2:12 AM