संतोष येलकर/अकोला : बँक खाते क्रमांकाअभावी दुष्काळग्रस्त शेतकर्यांचा शासनाकडे परत गेलेला मदतनिधी पुन्हा मागविला जाणार आहे. या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यापूर्वी राज्यात दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बँक खातेक्रमांकाचा शोध महसूल विभागाकडून घेतला जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात खरीप पिके हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी राज्य शासनामार्फत जिल्हानिहाय मदतनिधी वितरित करण्यात आला. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली मदत दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मदतनिधी तालुकास्तरावर वितरित करण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे काम काम तहसील कार्यालयांकडून करण्यात आले. राज्यातील दुष्काळग्रस्त जिलंमध्ये २0 मार्चपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यावर मदतनिधी जमा करण्याचे काम महसूल विभागामार्फत करण्यात आले होते. बँक खातेक्रमांक उपलब्ध नसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीचा निधी शासनाच्या आदेशानुसार २0 मार्च रोजीच जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत शासनाकडे परत करण्यात आला. बँक खाते क्रमांकाअभावी शासनाकडे सर्मपित करण्यात आलेला मदतनिधी पुन्हा शासनाकडून प्राप्त करण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये संबंधित दुष्काळग्रस्त शेतकर्यांचे बँक खातेक्रमांक प्राप्त करण्याचे काम महसूल यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले. तहसीलनिहाय शेतकर्यांचे बँक खातेक्रमांक उपलब्ध प्राप्त झाल्यानंतर शेतकर्यांच्या मदतीसाठी मदतनिधीची जिल्हानिहाय मागणी करण्यात येणार आहे. शेतकर्यांच्या बँक खाते क्रमांकाअभावी शासनाकडे सर्मपित करण्यात आलेला मदतनिधी आवश्यक असल्याची मागणी शासनाकडे करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत ९ एप्रिल रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत. त्यानुसार दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांच्या बँक खाते क्रमांकांचा शोध घेतला जात आहे.
आधी खाते क्रमांक, नंतरच मदत!
By admin | Published: April 21, 2015 12:24 AM