लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: बांधकाम क्षेत्रातील अनियमिततांना चाप लावण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा)ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पहिला दंड ठोठावला आहे. नियमानुसार महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी केली नसतानाही हावरे बिल्डर्सच्या प्रकल्पाची जाहिरात केल्याबद्दल साई इस्टेट कन्सल्टंट चेंबूर प्रा. लि. ला तब्बल एक लाख वीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.महारेराच्या निर्मितीनंतर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. नोंदणीशिवाय प्रकल्पाची जाहिरात, विक्री करण्यास मनाई आहे. हावरे बिल्डर्सच्या एका प्रकल्पाची नोंदणी झालेली नसतानाही होर्डिंग्ज् माध्यमातून जाहिरातबाजी करण्यात आली. याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीने महारेराकडे तक्रार दाखल केल्यानंतर दर दिवशी दहा हजार रुपयांप्रमाणे साई कन्सल्टंटला एकूण एक लाख वीस हजारांच्या दंड भरण्याचे निर्देश महारेराने दिले आहेत. याशिवाय तत्काळ या प्रकल्पाचे सर्व होर्डिंग्ज् काढून त्याजागी महारेराचा नोंदणी क्रमांक टाकण्याचे आदेश दिले आहेत. नियम समजून घेतोय -वाधवाणीसाई कन्सल्टंटचे संचालक अमित वाधवाणी यांनी सांगितले की, महारेराच्या कायद्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. महारेराचा कायदा अद्याप नवा आहे, तो आम्हीही समजून घेत आहोत. महारेरामध्ये ब्रोकर म्हणून नोंदणी करणारे आम्ही पहिलेच आहोत. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. संबंधित विकासकाची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. ती पूर्ण झालेली नसल्याने आम्हाला दंड ठोठावला आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट आमची चूक नाही. पारदर्शकतेचा आग्रह आम्हीही धरलेला आहे.
‘महारेरा’ प्राधिकरणाची पहिली कारवाई
By admin | Published: June 06, 2017 2:07 AM