- दिनकर रायकरमुंबई : यंदाचे पावसाळी अधिवेशन संपत असताना महाराष्ट्रातीलराजकारणात एक नवा इतिहास घडत आहे. १९७२ नंतर कोणत्याही एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. योगायोगाने वसंतराव नाईक ज्यांनी १३ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले तेही विदर्भातील होते. विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनी त्यांच्या एका जाहीर सत्कार समारंभात दिलेले एक उदाहरण महाराष्ट्राच्या आताच्याराजकारणाला चपखल लागू पडताना दिसत आहे. लता आणि आशा यांच्यातील नेमका फरक सांगताना आशा भोसले म्हणाल्या होत्या... चंद्रावर पहिले पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉँग या अंतराळवीराचे नाव सगळ्यांना आठवते. पण त्या पाठोपाठ काही सेकंदात चंद्रावर उतरलेल्या एडवीन आॅल्ड्रिनची दखल तितक्या संस्मरणीय पद्धतीने घेतली जात नाही. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीचेही नेमके असेच तर आहे!यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्यास ५९ वर्षे झाली. या दीर्घ कालावधीत यशवंतरावांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने पूर्ण टर्म मुख्यमंत्रीपद भूषविले. यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री पदावर बसले. अर्थात वसंतराव नाईक हे एकमेव की ज्यांनी पूर्ण टर्म (पाच वर्षे) मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांच्यानंतर पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद उपभोगणारे फडणवीस दुसरे नेते ठरणार आहेत. वसंतराव काँग्रेसचे तर देवेंद्र भाजपचे. आता येत्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजतील तेव्हा मुख्यमंत्रीपदाची टर्म ते पूर्ण करतील. शिवसेना-भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हेही आपली टर्म पूर्ण करण्याच्या स्थितीत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतांना राजीनामा द्यायला लावला व अवघ्या आठ महिन्यांसाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद दिले.
या इतिहासात फडणवीस यांच्या निमित्ताने नव्या पानाची भर पडणार आहे. त्या पानावरची काही तथ्ये विलक्षण आहेत. तितकीच दुर्लक्षितही. देवेंद्र हे राज्याचे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री. त्यांची सगळी कारकीर्द ही पहिला-दुसरा या आवर्तनातली आहे. पहिले या अंगाने विचार करायचा, तर ते सर्वात तरूण नगरसेवक. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून दाखल झाले. शिवसेनेच्या वर्धापनदिनाला पाहुणा म्हणून हजर राहिलेले इतर पक्षातले पहिले नेते मुख्यमंत्री. भाजपचा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री.दुसरा या अंगाने विचार करायचा तर राज्यात पूर्ण टर्म राज्य करणारा दुसरा मुख्यमंत्री. वयानुरूप शरद पवारानंतरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री. पवार ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले तर फडणवीस ४४ व्या वर्षी. फडणवीस २७ व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले. तरुणाईच्या अंगाने देशातला तो त्यांचा क्रमांक दुसरा. संजीव नाईक २१ व्या वर्षी नवी मुंबईचे महापौर झाले होते. पण ‘मेयर ईन कौन्सिल’मध्ये महापौर झालेले फडणवीस सर्वात तरुण नेते.
अर्थात त्यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या मूल्यमापनाचे मापदंड या पहिला-दुसराच्या पलिकडचे आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मुलुखमैदान तोफा नसतानाही त्यांनी भाजपला जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका निवडणुकांमध्ये अव्वलस्थानी नेऊन ठेवले. लोकसभा निवडणुकीत एकहाती निर्भेळ यश मिळवून दिले. एक मराठा-लाख मराठा या घोषवाक्यातून बनलेला स्फोटक राजकीय बॉम्ब शिताफीने निकामी करण्याचे कौशल्य त्यांनी दाखविले. मुद्दा जातीय प्रचार वा अभिनिवेशाचा नाही, पण एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण मंजूर केले, अशी नोंद त्यांच्यामुळे अपरिहार्यपणे होणार आहे. किंबहुना झाली आहे.
प्रत्येक पदावर त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला. आवाज बसू न देता तीन भाषांमध्ये खणखणीत भाषणे देण्याचा त्यांचा परिपाठ थक्क करून टाकतो. सेनेसारख्या मित्रपक्षासोबत संबंध ताणलेले असतानाच्या काळातले त्यांचे संयमी वागणे, विरोधकांसाठी बुलडोझरसारखी आक्रमकता या बाबी प्रकर्षाने अधोरेखित होत राहिल्या. ‘मिस्टर क्लीन’ची छबी ते अबाधित राखू शकले व स्वच्छता अभियानात महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कारही मिळवून देऊ शकले. आमचेच एक सल्लागार सहकारी विवेक रानडे यांच्या आग्रहास्तव आणखी तरुणपणी मॉडेलिंग केलेले देवेंद्र फडणवीस पन्नाशी गाठण्याच्या आत राजकीय रोल मॉडेल बनून गेले आहेत.
मुंबईवरही लक्षसाधारणत: मुंबईबाहेरच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर मुंबई महानगर आणि लगतच्या विस्तारीत क्षेत्रांत पायाभूत सुविधांचा गंभीरपणे विचार केला नव्हता. पण तो फडणवीस यांनी केला आणि कृतीत आणला हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. ते विदर्भापुरते न राहता महाराष्ट्राला आपले मुख्यमंत्री वाटत राहिले.