पुणे : थायलंड देशात बँकॉक येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर रोजी पहिले आंबेडकरवादी विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. दिपककुमार खोब्रागडे यांची तर स्वागताध्यक्ष पदी राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांची निवड करण्यात आली आहे.या संमेलनाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश के. जी. बाळकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, मलेशियातील जेष्ठ पत्रकार डी. के. पंजामूर्ती यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनात इंग्लंड, मलेशिया, जपान, तायवान, सिंगापूर, म्यानमार, व थायलंड मधील जगभरातील साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, सिनेकलावंत, असे सुमारे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उत्कृष्ट साहित्यकृतींना व सामाजिक, सांस्कृतिक, वाड्मयीन चळवळीत कार्य करणाऱ्या २५ व्यक्तींना यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सुमारे १८ लेखकांच्या ग्रंथांचे प्रकाशनदेखील संमेलनात होणार आहे. तर 12 लेखकांना आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार दिले जाणार आहेत.या दोन दिवसीय साहित्य संमेलनात आंबेडकरवादी साहित्य आणि जगातील इतर शोषितांचे प्रश्न, बौद्ध साहित्याशिवाय जगाला पर्याय नाही, आंबेडकरवादी स्त्रीवाद आणि पाश्चात्य जगातील स्त्रियांच्या वेदना आणि त्यांचे साहित्य, जागतिकीकरणाचा आंबेडकरवादी विश्व साहित्यावर पडलेला प्रभाव, आंबेडकरवादी विश्व साहित्याला आज विद्रोहाची गरज आहे काय? या विषयावर परिसंवाद होणार आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय काव्यसंमेलन व नागेश वाहुरवाघ यांच्या ‘देहदान’ या लघुचित्रपटचा शो तसेच प्रबोधन नाट्य परिषद, पुणे आयोजित ‘मी महात्मा फुले बोलतोय’ हे एकपात्री नाटक कुमार आहेर संमेलनात सादर करणार आहेत. या विश्व साहित्य संमेलनासाठी डॉ.परा धम्ममोसी (थायलँड) , डॉ. केले हुआंग (तायवान), डॉ. पुरुषोत्तम खेडेकर (महाराष्ट्र ), डॉ. वोन पियांग (सिंगापूर), इंदर इक्बाल सिंग अटवाल (पंजाब ),गौतम चक्रवर्ती (इंग्लंड) हे प्रमुख पाहुणे आहेत.
बँकॉक येथे पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 8:38 PM
संमेलनात जगभरातील साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, सिनेकलावंत, असे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
ठळक मुद्दे२५ व्यक्तींना यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार