मुंबई:कोरोनाची लस ही कलियुगातील संजीवनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस मुंबईत दाखल झाली असून, महानगरपालिका लस वितरणासाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर बोलत होत्या.
कलियुगातील संजीवनी मुंबईत आली आहे. आता घाबरायचे कारण नाही. काळजी करू नका. यामुळे कोरोना नियंत्रणात येणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड कोरोना लस मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत एकूण ०१ लाख ३९ हजार ५०० लस आल्या आहेत. मुंबईत ९ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आलेली आहेत. कोरोना लसीकरणासाठी पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने आधीपासूनच तयारी केली होती. मुंबईत एकूण ०१ लाख ३० हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली आहे, असेही पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबईत दाखल झालेली कोरोना लस परळच्या कोल्ड स्टोअरमध्ये ठेवण्यात येणार आहे. यानंतर ९ केंद्रांवर लसीचे वितरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील लोकांना लस देता येईल. या पार्श्वभूमीवर ८ सेंटर तयार असून, लवकरच आणखी ८ सेंटर तयार करण्यात येत आहेत. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे दोन सेंटरमध्ये काम करेल. मुंबईत जवळपास ५० सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रत्येक सेंटर २ शिफ्टमध्ये काम करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. लसीकरणानंतरही सर्वांना मास्क घालणे बंधनकारक असेल, असेही किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.
दरम्यान, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत. त्यांनाही कोरोनाची लस दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.