मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे २ गट पडले असून एकमेकांचे पदाधिकारी खेचण्यात शिंदे-ठाकरे गटात चढाओढ लागली आहे. त्यात ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त होती. आता शिंदे गटाला ठाण्यात धक्का बसला आहे.
ठाण्यात शिंदे गटातील माजी नगरसेविकेने पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी आणि भास्कर शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर जात बैरीशेट्टी कुटुंबाने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याचठिकाणी माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच शिंदे गटाला धक्के बसायला सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकनाथ शिंदेंनी दिला होता धक्कानुकतेच शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका ज्योती माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश घेतला. या प्रवेशाने ठाकरे गटाला धक्का बसला होता. महापालिका निवडणुकी पूर्वी असे धक्के बसणार असल्याचे संकेत शिंदे गटाने दिले होते.
शिंदे-ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांची पळवापळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचे समर्थक आपली शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे आता एकमेकांच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे रस्सीखेच वाढली असून यामुळे कार्यकर्त्यांना मात्र अच्छे दिन आले आहेत.
कार्यकर्त्यांना थेट नेत्यांचे फोनआजवर शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांकडून नागपूर- विदर्भातील शिवसैनिकांची फारशी विचारपूस होत नव्हती. मोठे नेतेही फारसे फिरकत नव्हते. कार्यकर्ता मुंबईत गेला तरी कुणी वेळ देत नाही, ऐकून घेत नाही अशी ओरड होती. आता मात्र, दोन्ही गटांच्या बड्या नेत्यांकडून थेट कार्यकर्त्यांना फोन येऊ लागले आहेत. काही अडचण असेल तर भेटा, काम असेल तर सांगा, असा नेत्यांचा दिलासादायक सूर त्यांना ऐकायला मिळत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"