मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे निर्माण झालेला वाद नुकताच शमला होता. तोच तानाजी चित्रपटातील दृष्ये वापरून व्हायरल झालेल्या व्हिडीओचा वाद सुरू झाला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला असून 'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला! अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय', अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
यावर भाजपाचे राज्यसभा सदस्य संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. तसेच कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, अशी विनंती सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना त्यांनी केली आहे.
Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप