Zika Virus In Maharashtra: आधीच कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना आता नव्या विषाणूनं राज्यात पाऊल टाकलं आहे. पुण्यात एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसची लागण झालेलं राज्यातील हे पहिलं प्रकरण ठरलं आहे. केरळमध्ये झिका व्हायरसची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. (first case of Zika virus reported in Maharashtra 50 year old woman patient was found in Pune district)
महाराष्ट्रात झिका विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातील ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे.
झिका व्हायरसची लक्षणेझिका आजाराची बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.
कशामुळे होतो?झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून, तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फॅलिव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ दूषित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा धोक्याची बाब निर्माण झालेली आहे.