नाशिक, दि. 1- मुंबईकर असो की नाशिककर आणि अहमदनगरवासीय पर्यटक पावसाळी सहलीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 'भंडारदरा' या डेस्टिनेशनला पसंती देत आहेत. मुंबईपासून इगतपुरी-घोटी मार्गे नाशिक पासून तर अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आणि संगमनेर, अकोले मार्गे अहमदनगर वासीयांनाही भंडारदरा जवळचे ठिकाण आहे.
‘विकेण्ड’ला सह्याद्रीच्या कुशीत जणू पर्यटकांची जत्राच भरलेली पहावयास मिळते. या डेस्टिनेशनमध्ये निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. शाळा, महाविद्यालयीन सहली असो की ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळांचे पर्यटन असो अशा सर्वच वयोगटातील निसर्गप्रेमी पहिली पसंत भंडारदरा परिसराला देताना दिसून येत आहे.
वाऱ्यासह वेगाने कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, परिसराने पांघरलेला हिरवा शालू सह्याद्रीच्या रांगेतील पाबरगड, आजोबा, कळसुबाई शिखर, रतनगड, अलंग-मदन-कुलंग, खुट्टा अशा विविध गडांना चढलेला हिरवाईचा साज अन् या डोंगररांगांवर वरूणराजाकडून सुरू असलेला जलभिषेक त्यामुळे वाहणारे लहान-मोठे धबधबे निसर्गसौंदर्यात अधिकच भर घालतात.
भंडारदरा धरण अर्थात विल्सन डॅम शंभर टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबररोबरच अम्ब्रेला फॉलही सध्या पर्यटकांच्या दृष्टीस पडत आहे. धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे हा फॉल तयार होतो. हा वॉटरफॉल शेंडी गावालगत पहावयास मिळतो.तेथून पुढे रतनवाडी-घाटघरच्या परिसरात भटकंती करताना नाणे वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल साम्रद जवळील आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या सांदण व्हॅलीमधील रिव्हर्स फॉल तसेच भंडारदरापासून राजूरच्या रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रंधा गावालगत असलेल्या श्री घोरपडादेवीच्या परिसरातील रंधा वॉटरफॉलसह नदीचा विस्तीर्ण परिसर आणि मंदिर विश्वस्ताकडून बांधण्यात आलेले लहान-लहान आकर्षक पादचारी पूल तयार करून परिसर विकसीत करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा ‘ट्रीप’मधील ‘रंधा’ला भेट प्रत्येकाची ठरलेली असते. या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पर्यटन स्थळावर परिसराती ग्राम विकास समिती व संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगारासाठी विविध खाद्यपदार्थांची विक्री करणे सोपे झाले आहे.