ठाणे : येथील खारीगाव परिसरात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विविध राज्य परिषदांचे देशातील पहिले एकत्रित प्रशासकीय कार्यालय महाराष्ट्र चिकित्सा परिषद संकुलाचे भूमिपूजन रविवारी झाले. त्यामुळे सर्व वैद्यकीय शाखांचा एकत्रित कारभार करणारी १०० कोटींची भव्य वास्तू या ठिकाणी उभारली जाणार आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. सध्या महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय शाखांचा कारभार विविध शहरांतील प्रशासकीय कार्यालयांतून केला जात आहे. या सर्वांचे एकत्रीकरण करून प्रशासकीय कामाच्या दृष्टीने सुसूत्रता येण्यासाठी एकाच ठिकाणी या शाखा जोडण्याचा हा निर्णय घेतल्याचे आव्हाड यांनी सांगितले. याप्रसंगी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वैद्यकीय शिक्षणातील पहिले एकत्रित प्रशासकीय कार्यालय ठाण्यात
By admin | Published: September 01, 2014 3:30 AM