मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करण्यात भाजपच नव्हे तर पुन्हा एकदा सत्तेत परतलेल्या काँग्रेसचे नेते देखील निष्णांत आहेत. 2014 पूर्वी सत्तेत असताना अनेक काँग्रेस नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्य करण्यात आली होती. आता सत्तेत आलेल्या काँग्रेसकडून खातेवाटप निश्चित होताच वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
राजकारणात रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले.
ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. कारंजा येथे शनिवारी त्यांनी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे प्रचारसभेत सांगितले. ठाकूर यांनी महाविकास आघाडीकडून वादग्रस्त वक्तव्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढचा नंबर कोण लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झाले आहे.