मुंबई : भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे. भोंग्याच्या मागून कोण बोलत आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का, याकडे लक्ष द्या, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. महागाई किती वाढली, पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडर किती महागला? सीएनजी किती महागला, त्यामुळे दळणवळण किती महागले? त्याच्या परिणामाने भाजीपाला, अन्नधान्याच्या किमती किती वाढल्या हे प्रश्न कोण विचारणार?, असा सवाल आव्हाड यांनी केला. धार्मिक द्वेषातून निर्माण झालेल्या आगीत कोणत्याही नेत्याची मुले जळणार नाहीत. पण, तुरुंगात मात्र, सामान्य माणसाची मुले खितपत पडतील. या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे प्रकार अमान्य असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.महागाईबाबत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रतिक्रिया संतापजनक असल्याचे सांगताना आव्हाड म्हणाले की, हे लोक बेफिकिरी दाखवतायत, कारण धार्मिक द्वेष पसरवला तर आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. २०१४ रोजी ७१ रुपये प्रतिलीटर असलेले पेट्रोल आज सव्वाशे रुपयांवर आलेले असताना अर्थमंत्री बोलणार नसतील तर आपण काय बोलणार? असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आधी नोकऱ्या किती गेल्या त्याची मोजदाद करा - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:47 PM