मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली कट आॅफ सोमवारी जाहीर झाली. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांनी ९३ टक्क्यांवर झेप घेतली. त्यामुळे ९० टक्के मिळूनही विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रतीक्षा यादीची वाट पाहावी लागणार आहे. तरी एकूण ४७ हजार ६४८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याची माहिती मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने दिली.गेल्यावर्षीच्या तुलनेत गुणवत्ता यादीत एक ते दोन टक्क्यांची वाढ दिसली. यंदा दहावीला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या घसरली होती. त्यामुळे कट आॅफचा आकडा घसरण्याची चिन्हे होती. मात्र पहिल्याच कट आॅफने हा अंदाज खोडून काढला आहे. यावर्षी आॅनलाईन प्रवेशासाठी अकरावीला एकूण २ लाख २२ हजार ६२२ अर्ज आले. त्यातील १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्याच यादीत निश्चित झाले आहेत. त्यात एकूण ९१ हजार ६७० मुले आणि ९३ हजार ३०७ मुलींचा समावेश आहे. दोन ते पाच यांपैकी पसंतीक्रम दर्शवलेल्या ६२ हजार ९३० विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाले आहेत. काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>मुंबईबाहेरून प्रवेशाला प्रतिसादमुंबई महानगर प्रदेशासह प्रदेशाबाहेरून आणि राज्याबाहेरून प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. पहिल्याच यादीत कला शाखेसाठी मुंबई महानगर प्रदेशातून १६ हजार ५८७, मुंबई महानगर प्रदेशाबाहेरील ५८४ आणि राज्याबाहेरील १६० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.तर वाणिज्य शाखेसाठी मुंबई महानगर प्रदेशातील १ लाख ०५ हजार ४२७, मुंबई महानगर प्रदेशाबाहेरील २३ हजार ५२५ आणि राज्याबाहेरील ६६६ विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. विज्ञान शाखेसाठीही मुंबई महानगर प्रदेशातून ५६ हजार १६२, मुंबई महानगर प्रदेशाबाहेरून २ हजार ३९८ आणि राज्याबाहेरून ४६८ विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीत प्रवेश निश्चित केला आहे.
पहिलीच कट आॅफ ९३%
By admin | Published: June 28, 2016 3:58 AM