सोलापूर: आधी जाती नष्ट करा, मग आम्ही आरक्षण मागणार नाही, असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या प्रस्तावाला विरोध केला. ते शनिवारी सोलापूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आर्थिक निकषावरील आरक्षणाला विरोध केला. रिपब्लिकन ऐक्यासाठी मराठा समाजात फूट पाडा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि हमीभावाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी केली. याशिवाय, सरकारने इंदू मीलचा प्रश्नही मार्गी लावावा, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या मुलाखतीत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, असे मत मांडले होते. त्यानंतर लगेचच आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या देशात जाती आहेत, तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहणार. दलित, आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातिव्यवस्था नष्ट करा, मग जातीआधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सर्व ताकदीनिशी तो हाणून पाडू. जाती नष्ट झाल्याशिवाय जातीआधारित आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा; लिंगायत; ब्राह्मण आदी सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवून ७५ टक्के करण्यात यावी. तसे झाल्यास सर्वाना आरक्षणाचा लाभ मिळून आरक्षणावरून होणारी भांडणे मिटतील असा दावा रामदास आठवले यांनी केला होता.
जाती नष्ट करा, आम्ही आरक्षण मागणार नाही- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 10:14 PM