ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ३ - पावसाने पाठ फिरवल्याने हताश झालेल्या शेतक-यांचा कृत्रिम पावसानेही अपेक्षाभंग केला आहे. नाशिकमधील सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला असून आता ऊन पडल्याने प्रयोग थांबवण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांशी भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हताश झाले असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतक-यांना आशेचा किरण दिसत होता. रविवारी नाशिकमधील सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी तज्ज्ञांचे पथक झाले आहे. रविवारी वातावरण निर्मिती न झाल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करता आला नव्हता. अखेरीस सोमवारी सकाळी सायगाव येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु झाला. सायगाव येथून ढगांवर पाच रॉकेट्सचा मारा करण्यात आला. यातील चार रॉकेट्सचा प्रयोग अपयशी ठरला. सकाळी साडे आठच्या सुमारास ऊन पडल्याने हा प्रयोग थांबवण्यात आला. कृत्रिम पावसाचा प्रयोग अपयशी ठरल्याने या प्रयोगाविषयी आता शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.