नामदेव मोरे /लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने देशभर खळबळ उडाली असताना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २५ आॅक्टोबर १९३३ मध्ये चरीकोपरमध्ये खोती पद्धतीविरोधात तब्बल सहा वर्षे जमीन न कसता केलेल्या शेतकरी संपाची आठवणी निघत आहेत. देशाच्या व कदाचित जगाच्या इतिहासामधील सर्वाधिक काळ सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप, म्हणूनही रायगडमधील या आंदोलनाची ओळख आहे. कोकणामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यापैकी ७५ टक्के वाटा खोतांनी मागितला होता. या अन्यायाविरोधात नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागजवळील चरीकोपर येथे शेतकरी परिषद झाली. जोपर्यंत कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी शेती करणे बंद करावे, असे आवाहन नारायण पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या दिवसापासूनच संप जाहीर केला. शेतकऱ्यांचा संप टिकणार नाही. उपासमार सुरू झाली की शेती कसायला सुरुवात करतील, असे खोतांना वाटले होते; परंतु शेतकरी निर्णयावर ठाम राहिले. मोलमजुरी करून, शहरात धुणीभांडी करून उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली.
देशातील पहिला शेतकरी संप रायगडमध्ये
By admin | Published: June 02, 2017 3:19 AM