- दत्ता बारगजे, संस्थापक, इन्फन्ट इंडिया
न १९९८ मध्ये शिक्षण संपवून मी ग्रामीण रुग्णालय, भामरागड (जि. गडचिरोली) येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आरोग्यसेवेत दाखल झालो. तेथून अवघ्या दोन-अडीच कि.मी. अंतरावरील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी, हेमलकसा प्रकल्पात ये-जा सुरू झाली. अधून-मधून बाबा आमटे येत असत. सोमनाथ प्रकल्पाच्या शिबिरात एकदा बाबा म्हणाले,‘आनंदवनाची बेटं’ निर्माण करा. हे त्यांचे वाक्य मनात खोलवर रुजले होते.
सन २००३ मध्ये मी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झालो. त्यावेळची समाजातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती भयावह होती. तो काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. एड्स हे नाव उच्चारायलाही माणसं घाबरत असत. मी जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी तंत्रज्ञ! रक्ताच्या तपासण्या करत असताना एचआयव्ही / एड्सच्या तपासणीची जबाबदारीही माझ्यावर होती. एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आली की वेदना, आक्रोश, भीती, अव्हेरलेपण, अपराधीपणाची भावना... असा सारा कल्लोळ दिसे. मी शक्य होईल तसा आधार देऊ लागलो. एड्स जनजागृतीसाठी शासकीय कार्यक्रम करताना दुसरीकडे एचआयव्हीबाधितांची अव्हेरलेली आयुष्ये, विस्कटलेली घरटी, मृत्यूच्या दिशेने होणारा अपरिहार्य प्रवास या सगळ्यांचे चटके बसत होते; कारण मी त्यांचा होऊन जगत होतो.
विशाल आणि योगेश या दोन मुलांना घेऊन ब्लड बँकेत आलेली पार्वती निमित्त झाली. ती व विशाल एचआयव्ही पॉझिटिव्ह; तर योगेश निगेटिव्ह! पार्वती ओक्साबोक्सी रडली... मी त्या तिघांना घरी घेऊन गेलो. संध्याने त्यांना जेवू घातले. आम्ही विशालला घरी ठेवून घेतले, पार्वती गेली ती पुन्हा कधीच परतली नाही. आईचा अंत्यविधी करून नऊ वर्षांच्या विशालने आमच्या घराचा रस्ता धरला तो कायमचाच. योगेशलाही तो सोबत घेऊन आला! पार्वतीच्या एकाकी मरणयातनांनी हादरलो होतो. मी संध्यासोबत चर्चा केली. ती होती. आमच्या घरीच इन्फंट इंडियाच्या कामाची सुरुवात झाली. विशालच्या वेदनेतून सुरू झालेल्या या कार्याला कोणत्याही विशिष्ट प्रारंभाची गरज लागली नाही. कालौघात आमच्या संस्थेत एड्सग्रस्त बालकांची रीघ लागली.
विशालमागोमाग सूरज आला... नंतर संजय, ज्योती, कोमल, नितीन... घर अपुरे पडू लागले. जागेची शोधाशोध सुरू झाली. मी दिवसभर नोकरीत; संध्या मुलांचा सांभाळ करायची! मग भाड्याने जागा घेतल्या. भाडे भरायची पंचाईत झाली, तेव्हा अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. मुले लहान असताना खाणे-पिणे, शाळा, आरोग्याची देखभाल(ART-CD4) आजारपण.... संस्कार महत्त्वाचे होते. मुलांची संख्या ४५ झाल्यावर संस्थेने स्वत:ची जागा घेतली.
सन २०१४ मध्ये राणी आणि कोमल या दोन मुलींचे पहिले कन्यादान आम्ही केले. समाजातील एचआयव्ही पॉझिटिव्ह वर शोधून, त्याची गृहचौकशी करून, मुलीलाही घर-दार-प्रॉपर्टी पाहण्याचा अधिकार देऊन असे विवाह जुळवण्याचा नवीन पायंडा पाडला. त्यानंतर असे २१ विवाह ‘आनंदग्राम’मध्ये पार पडले. घरापासून बालपणीच वंचित झालेल्या मुलींना हक्काचे घर व आपलेपणाची नाती मिळाली. त्यांच्या पोटी जन्माला आलेली मुले एचआयव्ही निगेटिव्ह असणे, हा मोठा दिलासा झाला!
हळूहळू वाढत्या वयातील मुलांचे वेगळे प्रश्न डोके वर काढू लागले. स्वतःचे वेगळेपण, समाजाबद्दलचा राग, तिरस्कार, आपले आयुष्य-भविष्य अंधारलेले आहे, अशी भावना. मग समुपदेशन, पुनर्वसन हे प्रश्न पुढे आले. काहींना शासकीय आयटीआयच्या माध्यमातून कौशल्यविकास... काहींना खासगी नोकरी, योग्य जोडीदार शोधून उपवर मुला-मुलींची लग्ने लावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम सुरू झाले.
काही वर्षांपूर्वी अस्पृश्य ठरवून समाजात हिणकस जिणे वाट्याला आलेल्या एड्सग्रस्तांना हळूहळू समाजाने स्वीकारण्याची ही कहाणी आहे. बदलाचा वेग कमी असेल; पण आपला समाज बदलतो आहे, याचा हा पुरावाच!