मुंबई : ‘आधी फाशी, मग चौकशी’ हा उफराटा न्याय योग्य नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत पोलीस चौकशीत काय ते सत्य बाहेर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील’ अशी भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मांडली. त्यामुळे पक्षाने राठोड यांना अभय दिले असल्याचे सध्याचे चित्र आहे.टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मंगळवारी सकाळपासून सुरू होती. मात्र, त्यांनी राजीनामा दिलेला नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की विरोधी पक्ष हे राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत, ती योग्य नाही. विरोधकांनी संयमाने घेण्याची गरज आहे. चौकशी न करताच एखाद्याला फाशी देणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या मातीत सत्य आणि न्याय आहे, पोलीस चौकशीत तथ्य समोर येईलच. मीडिया ट्रायलदेखील योग्य नाही. चौकशीपूर्वीच निष्कर्ष काढून शिक्षा देऊन मोकळे होणे हे चुकीचे आहे. केवळ संजय राठोड म्हणून नव्हे, तर पूजा चव्हाणलाही न्याय मिळावा यासाठी चौकशी आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या बैठकीत चर्चाविधिमंडळाचे आगामी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदारांची बैठक घेतली. वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.राठोड मात्र या बैठकीला हजर नव्हते. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर ते जनतेसमोर कुठेही आलेले नाहीत. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे गुरुवारी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राठोड त्यांचे मौन तोडतील असे म्हटले जाते.
राजीनामा ही अफवामाझ्याबाबत आपण घ्याल तो निर्णय मला मान्य असेल, असे राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले होते. तथापि, त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असे यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितले.