- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच कार्यान्वित होत असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित बैठकीत या कार्यशाळेच्या उभारणीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.संसर्गजन्य संशोधन प्रयोगशाळेत सूक्ष्मजीव शास्त्र, विषाणू विभाग, रक्तातील पातळ द्रव्याच्या अभ्यासाचा विभाग व रेण्वीय विभाग, असे चार विभाग कार्यरत राहणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. इथे एकूण १३ रोगांवरील तपासण्या होणार आहेत. या प्रयोगशाळेत वीजपुरवठा अखंड उपलब्ध राहावा, यासाठी जनरेटर सुविधा, तसेच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम लवकरात-लवकर पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी डॉ. सावंत यांनी दिल्या.बैठकीत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. व्ही. एस. सिंग, महसूल व वनविभागाचे सचिव विकास खारगे, संचालक डॉ. सतीश पवार, एन.आय.व्ही. पुणेचे संचालक डी. टी. मोर्य, सहसंचालक डॉ. एम. एस. डीग्गीकर, डॉ. प्रदीप आवटे, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि. प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपसंचालक समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.