लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात चर्चेत असलेल्या कोमल पवारचे हृदय अन् फुप्फुस बदलण्यात शुक्रवारी चेन्नईच्या दिग्गज डॉक्टरांना यश आले आहे. एकाचवेळी दोन महत्त्वाचे अवयव बदलणारी कोमल ही देशातील पहिली तरुणी ठरल्याची माहितीही तिचे पती धीरज गोडसे यांनी ‘लोकमत’ला दिली. सातारा येथील अभियंता कोमल हिचे लग्न झाल्यानंतर गेल्यावर्षी तिला ‘प्रायमरी पल्मोनरी हायपरटेंशन’ नावाचा दुर्मीळ आजार झाल्यामुळे तिचे हृदय अन् फुप्फुस बदलण्याची तयारी चेन्नईच्या डॉक्टरांनी सुरू केली होती. मदुराई येथून शुक्रवारी सकाळी फुप्फुस विमानाने आणण्यात आले होते. चेन्नई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉ. संदीप अट्टावर, डॉ. राहुल विजलीन, डॉ. गोविनी बालसुब्रह्मण्यम् अन् डॉ. रविकुमार या तज्ज्ञांनी चॅलेंज म्हणून ही केस स्वीकारली होती. सलग नऊ तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, पुढील ४८ तास कोमलसाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हृदय अन् फुप्फुस बदलणारी देशातील पहिली तरुणी
By admin | Published: June 10, 2017 2:49 AM