भाजपाच्या उमेदवारांची आज पहिली यादी होणार जाहीर?; उत्तर महाराष्ट्रात आघाडीला तगडे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 08:41 AM2019-09-29T08:41:38+5:302019-09-29T08:44:23+5:30
महाराष्ट्रातली सत्ताधारी भाजपा रविवारी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
मुंबईः महाराष्ट्रातली सत्ताधारी भाजपा रविवारी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील भाजपा नेते मोदींशी चर्चा केल्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राचा यशस्वी दौरा करून भारतात परतले आहेत. संभाव्य यादीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. निवडणूक आयोगानं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबर ही अंतिम तारीख दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रात भाजपानं वाढवल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी
विधानसभा निवडणुकीत भाजपाची नजर उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांवर आहे. ज्याला कधी काळी काँग्रेसचा गड समजला जात होता. उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात काँग्रेस कमजोर झाली आहे. तर दुसरीकडे भाजपा इथे ताकद वाढवण्यात यशस्वी ठरली आहे. भाजपाला या जिल्ह्यांत प्रसार करण्यात कोणतीही कमी ठेवायची नाहीये. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे दोन्ही विरोधी पक्षांची अडचण वाढलेली आहे. आदिवासीबहुल नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पारंपरिक स्वरूपात काँग्रेस-राष्ट्रवादी मजबूत आहे.
भाजपानं राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजय कुमार गावित यांची मुलगी हिना गावितला पक्षात सामावून घेतल्यानंतर आघाडीच्या या गडाला पहिल्यांदा खिंडार पडला. आता काँग्रेसचे दिग्गज नेते अमरिश पटेलही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपाची उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. नाशिकमध्ये काँग्रेसजवळ दोन आमदार होते. ज्यातील निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर अहमदनगरचे अकोलेतील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील या दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपा चांगली कामगिरी करेल, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांत 47 जागा
उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत 288 विधानसभा जागांपैकी 47 जागा आहेत. ज्यात नंदुरबारमध्ये चार विधानसभा मतदारसंघ, धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघ, जळगावात 11 विधानसभा मतदारसंघ, नाशिकमध्ये 15 विधानसभा मतदारसं, तर अहमदनगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.