लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत नाव येते की नाही? याची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या पदरी सोमवारी निराशाच पडली. सायंकाळी ५ वाजता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आले होते. पण, कंपनीने योग्य पद्धतीने आणि नियोजनबद्धपणे काम न केल्याचा फटका म्हणून रात्री १२ वाजेपर्यंत यादीच जाहीर झाली नाही. रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पहिल्या यादीत नाव लागते की नाही हे पाहण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय गाठले होते. सायंकाळी ५ वाजता यादी जाहीर न झाल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील फोन खणाणू लागला होता. तांत्रिक कारणांमुळे सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी जाहीर न करता, सायंकाळी ७ वाजता यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. थोड्याच वेळात निकाल रात्री उशिरा लागणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला. सोमवारी दुपारपासून कंपनीने डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली. विद्यार्थी अधिक असल्याने डेटा अपलोड व्हायला वेळ लागत आहे. त्यामुळे ७ वाजताचीही डेडलाइन पुढे ढकलून थेट १२वर गेली. यादी अपलोड होण्यास तांत्रिक अडथळे येत असल्याने ही वेळ आल्याचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे प्रवेशाची सर्व माहिती देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. मध्यरात्रीपर्यंत ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून प्रवेश सुरू होणार असून, कोणतीही काळजी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर यासंदर्भात नायसा कंपनीशी संपर्क साधला असता यादी अपलोड होण्यास अडथळे झाल्याने हा प्रकार झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.कारवाईची मागणी अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत सातत्याने होत असलेला गोंधळ, कंपनीने डेडलाइन न पाळणे याचा गांभीर्याने विचार व्हावा. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मनविसेचे चेतन पेडणेकर यांनी केली. कंपनीने योग्य नियोजन न केल्याने विद्यार्थी आणि पालक वेठीस धरले गेले असून शिक्षणमंत्र्यांनी या कंपनीवर कारवाई करण्याचे धाडस दाखविण्याचे आवाहन पेडणेकर यांनी केले.
अकरावीच्या पहिल्या यादीलाच ‘लेटमार्क’
By admin | Published: July 11, 2017 5:49 AM