मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याअखेर कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीतल्या 68 गावांमधल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रमाणपत्र बहाल केलं जात आहे. जिल्हा स्तरावरून कर्जमाफी देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज 24 हजार 723 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटींचं नियोजन करण्यात आलं होतं. अशा पद्धतीनं एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी केली असून, त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्चला चर्चा होणार आहे.