मुंबई : अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेश अर्जामध्ये दुरूस्ती केल्यानंतर मुंबई शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने बुधवारी २ लाख ६४९ प्रवेश अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता सर्वसाधारण आणि पहिल्या यादीची प्रतीक्षा आहे.मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपली. तर अर्जांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. यंदा दहावीच्या ऐतिहासिक निकालात ३ लाख ३ हजार ९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र त्यातील केवळ २ लाख ६४९ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेशाला पसंती दिली आहे. म्हणजेच १ लाख विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रक्रियेव्यतिरिक्त अन्य शाखांना पसंती दिल्याची स्पष्ट होते. दरम्यान, अकरावीची आॅनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण यादी २० जून रोजी प्रसिद्ध होणार आहे तर अकरावीची पहिली कट आॅफ लिस्ट २२ जूनला प्रसिद्ध होईल. ९० टक्के विद्यार्थी एसएससी बोर्डाचेअकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांत ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी एसएससी बोर्डाचे आहेत. तर आयसीएससी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डातून केवळ ५ टक्के विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे उपसंचालक कार्यालयाने सांगितले. त्यामुळे यंदा एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी काही प्रमाणात आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल.
विद्यार्थ्यांना आता प्रतीक्षा पहिल्या यादीची
By admin | Published: June 18, 2015 2:49 AM