ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २५ - राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी ठाण्यातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल केला आहे. एफ ए इंटरप्रायझेस या कंपनीतील पाच तर कोकण पाटबंधारे विभागातील सहा अधिकारी अशा ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीकडून चौकशी सुरु असून याप्रकरणी एसीबीने मंगळवारी ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केला. रायगडमधील बाळगंगा धरणाच्या निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली होती. एफ ए इंटरप्रायजेस या कंपनीला कंत्राट मिळवून देण्यात कोकण पाटबंधारे विभागातील अधिका-यांनीही मदत केली होती. या प्रकरणी अंजली दमानिया यांनी एसीबीकडे तक्रारही दिली होती. सखोल चौकशी केल्यानंतर एसीबीने ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अखेर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आता आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे. ९० टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या बाळगंगा धरणाच्या पोस्ट टेंडर प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला व या धरणाचा खर्च तब्बल १५०० कोटी रुपयांपर्यंत गेला असा आरोप दमानिया यांनी केला आहे.