राजाराम लोंढेकोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत राज्यात उसाची उपलब्धता जास्त असली तरी वाढलेली एफआरपी व स्थिर राहिलेले साखरेचे दर पाहता, यंदा तीन हजारांच्या पुढेच पहिली उचल शेतकºयांच्या हातात मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.गेल्या हंगामात गाळप कमी झाल्याने साखरेचे उत्पादन घटले. परिणामी वर्षभर दर स्थिर राहिले. आॅगस्ट २०१६ मध्ये स्थानिक बाजारपेठेत साखरेचा दर प्रतिक्विंटल ३३५० रुपये राहिला. नोव्हेंबर २०१६ पर्यंत दर घसरुण ३,२२५ पर्यंत पोहोचला. त्यानंतर बाजारपेठेने उचल खाल्ली आणि मार्च २०१७ मध्ये दर तब्बल ३,६७५ रुपयांपर्यंत गेला. फेबु्रवारी २०१७ मध्ये ३,६५६ रुपयांपर्यंत गेलेला दर आॅगस्टमध्ये २,४२६ रुपयांपर्यंत खाली आला.कृषिमूल्य आयोगाने यंदा ‘एफआरपी’मध्ये वाढ केल्याने ९.५ टक्के उताºयाला २,५५० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्याला २६८ रुपये मिळतील. राज्याचा गतवर्षीचा सरासरी उतारा ११.२६ टक्के असल्याने ३०२० रुपये एफआरपी होते. त्यातून तोडणी-वाहतूक खर्च ५३५ रुपये वजा जाता २५०० रुपये प्रतिटन एफआरपी देय राहते. यंदा कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक ३०० रुपयांची मागणी केली आहे. ‘स्वााभिमानी’ शेतकरी संघटना २८ आॅक्टोबरच्या ऊस परिषदेत घोषणा करणार आहे. त्यांच्याकडून एफआरपी अधिक ५०० रुपयांची मागणी होऊ शकते. परंतु दोनशे ते अडीचशे रुपयांची तडजोड होऊन धुराडी पेटू शकतात.गतवर्षीपेक्षा ‘एफआरपी’ वाढली तरी राज्य सहकारी बॅँकेचे मूल्यांकन ३,५०० रुपयेच राहणार आहे. त्यातील ८५ टक्के म्हणजे २९७५ रुपये कारखानदारांना मिळणार आहेत. त्यातील २५० रुपये कन्व्हर्शन कॉस्ट तर पाचशे रुपये कर्जाचा हप्ता जाणार आहे. त्यामुळे पहिल्या उचलीसाठी कारखान्यांच्या हातात २,२२५ रुपये राहतात. कर्जाचा हप्ता नसलेल्या कारखान्यांना पाचशे रुपये वापरण्यासाठी मिळतात. पुढील पंधरवड्याच्या साखरेवर उचल करून तीन हजार उचल देणे सहजशक्य आहे; पण अडचणीतील कारखान्यांसमोर दराचे अग्निदिव्य राहणार आहे.
पहिली उचल तीन हजारांवर!, एफआरपी सरासरी २,५०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 4:29 AM