शिर्डी : साईनगरी हवाई नकाशावर आणण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या विमानतळावर बुधवारी पहिले चार्टर विमान उतरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांमध्ये विमानतळ सुरू करण्याचे ठरविले असून त्याचाच भाग म्हणून बुधवारी चाचणी घेण्यात आली.बुधवारी सकाळी ९.३० वाजता मुंबईहून आलेले विमान येथे उतरले. एक वाजता विमानाने धुळ््याच्या दिशेने उड्डाण केले. बॉम्बे फ्लार्इंग क्लब अर्थात शासकीय मालकीच्या अमेरिकन बनावटीच्या पायपर सैनिका या सहा आसनी विमानाने बुधवारी सकाळी ८.३० वाजता जुहू हवाईतळावरुन शिर्डीसाठी उड्डाण केले होते़ विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील हे विमानातून शिर्डीला आले होते. शिर्डीला येणाऱ्या पहिल्या विमानाचे पायलट होण्याचा मान कॅप्टन जे. पी. शर्मा, भगवती मेहेर यांना मिळाला. मुंबई ते शिर्डी अशा अवघ्या ४५ मिनिटांत आम्ही पोहोचलो. हा प्रवास सुखद होता, अशा भावना कॅप्टन शर्मा व भगवती यांनी व्यक्त केल्या. हा क्षण ऐतिहासिक असला तरी काकडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नसल्याने आम्ही आनंदी नाही, विमानतळ विकास कंपनीच्या चुकीमुळे आम्ही चाळीस वर्षांत प्रथमच पाणीटंचाई अनुभवत असल्याचे ग्रामस्थ दत्ता यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
शिर्डीत उतरले पहिले विमान!
By admin | Published: March 03, 2016 4:44 AM