ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.05 - देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा जात, पंथ, धर्म आहेच. परंतु प्रत्येकाने सर्वात अगोदर देशाला प्राधान्य द्यायला हवे. देशासमोर इतर गोष्ट गौण आहे, असे मत अभिनेते बोमन इराणी यांनी व्यक्त केले. पाकिस्तानच्या कलाकारांबाबत सुरू असलेल्या वादावर त्यांनी थेट वक्तव्य देण्यास नकार दिला. मात्र पाकिस्तानच्या कलाकारांची बाजू धरुन लावणा-या ‘बॉलीवूड’मधील कलाकारांना त्यांनी अप्रत्यक्षपणे चपराकच लगावली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘जाल.पी.गिमी’ व्याख्यानमालेसाठी ते आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
माझे आजोबा हे इराणहून मुंबईत स्थायिक झाले होते. मी पारशी असलो तरी सर्वात अगोदर भारतीय आहे. देश मला प्राणाहून प्रिय आहे. देशात मला कधीही असुरक्षित वाटले नाही. कुठेही गेले तर मला सुरक्षितच वाटते, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. भारतीय सैनिकांवर उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवरुन वाद निर्माण झाला आहे. चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले आहे. या वादावर त्यांना विचारणा केली असता त्यांनी यावर कुठलेही थेट विधान करण्यास नकार दिला. मी चित्रपटसृष्टीतील कुठल्याही गटात नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.