- पंढरीनाथ गवळी । लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ (जि. जळगाव) : रोज सुमारे दीड हजार विविध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी भुसावळ येथील रेल्वेची क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था (झेडआरआयटीआय) आता सौरऊर्जेवर कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे वर्षाला ७० लाख रुपयांची वीजबिलाची बचत होत आहे.भुसावळातील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेच्या टेरेसवर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही प्रणाली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई येथे एका सोहळ्यात नुकतीच राष्ट्राला अर्पण केली. झेडआरआयटी संस्थेत साडेतीन कोटी रुपये खर्च करून हा सौरऊर्जा प्रकल्प २१ नोव्हेंबर २०१६पासून आकारास आला आहे. त्यात ४.५९५ मे.वॅ. इतका वीजभार आहे. वर्षभरात येथे सात लाख युनिट वीज तयार होते. संस्थेत प्रशिक्षणार्थींसाठी सहा प्रशस्त इमारती आहेत. त्यात एक मुख्य प्रशासकीय इमारत आहे. तीन मॉडेल रूम आहेत. दोन सिम्युलेटर, एक सभागृह आणि मेस. सर्व ठिकाणी सौरऊर्जेद्वारे विजेची गरज भागविली जात आहे.