ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. २३ - दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे जलयुक्त शिवारअभियानांतर्गत ८० शेततळे करण्यात आली आहेत. शेततळे यशस्वी झाले का, एका शेततळयातून किती एकर शेतीला सिंचन सुविधा पुरविली जाऊ शकते हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत'ने प्रातिनिधिक स्वरुपात अरुण विश्वासराव टाले यांच्या शेततळ्याची निवड केली. रविवारी रात्री दर्यापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह दोन तास जोरदार पाऊस झाला. त्याअनुषंगाने या शेततळयाची पाहणी केली असता पहिल्याच पावसात या शेततळ्यात मुबलक स्वरुपात जलसाठा झाला. या ठिकाणी पूर्वी अल्पसाठा होता. टाले यांच्या शेतातील हे शेततळे ३० मीटर बाय ३० मिटर व खोली १० फुट या आकाराचे आहे. सन २०१५-१६ या वर्षांत शेततळे खोदण्यात आले. या शेततळ्यात व्यापक जलसाठा झाल्यास त्यातून ६ ते ७ एकर खरीप आणि रबी अशा दोन्ही हंगामातील पिके सिंचनाखाली येऊ शकतात. सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये पाऊस अपेक्षित धरून शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रगतिशील शेतकरी विलास टाले व विलास पोटे या शेतकऱ्यांशी चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावातील शेततळयांची पाहणी केली होती. व अनेक नविन शेततळयांचे भूमिपूजनही केले होते. (प्रतिनिधी) १) शेततळ्यात पहिल्याच पावसात जलसाठा झाला. २) सलग पावसाची नोंद झाल्यास व्यापक जलसाठा होऊ शकतो. ३) नरदोडा येथे एकाच गावात सर्वाधिक ८० शेततळी पूर्ण४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वीच दिली होती भेट.
नरदोडा येथे पहिल्याच पावसात मुरले शेततळ्यात पाणी
By admin | Published: June 23, 2016 10:50 PM