ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - अनेक महिन्यात उन्हाच्या कडाक्यात भाजून निघालेल्या मुंबईकरांना शनिवारी सकाळी आलेल्या पावसामुळे सुखद गारव्याचा दिलासा मिळाला आहे. मात्र याच पहिल्या पावासचा फटका मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकल सेवेला बसल्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.
सीएसटीच्या दिशेने जाणा-या स्लो व फास्ट मार्गावरील लोकलच्या ओव्हरहेड वायरमध्ये स्पार्किंग झाल्याने मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात स्लो व फास्ट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास मुलुंड स्थानकात आलेल्या सीएसटी फास्ट व स्लो अशा दोन्ही लोकलच्या ओव्हरहेड वायरमध्ये स्पार्क होऊन दोन्ही मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली. स्पार्किंग होत असल्याचे पाहून अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून सुरक्षित ठिकाणचा आसरा घेतला. मात्र बराच वेळ होऊनही लोकल वाहतूक सुरू झाली नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ ( स्लो ट्रॅक) व प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ( फास्ट ट्रॅक) येथील वाहतूक सुरू होणार नाही, अशी उद्घोषणा स्थानकात करण्यात आली. वाहतूक पूर्ण ठप्प झाल्याने मध्य रेल्वेवर लोकलच्या रांगा लागलेल्या होत्या.
तर पश्चिम व हार्बर रेल्वेवरही पावसानंतर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असून त्या मार्गावरील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. चर्चगेट ते मरीन लाइन्सदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे स्लो मार्गावरील वाहतूक फास्ट मार्गावर वळवण्यात आली आहे. सर्व लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडालेली असतानाच असतानाच आता तिनही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाली असून चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.