लोकमत न्यूज नेटवर्कभिलार (जि.सातारा) : मोठ्या थाटामाटात पुस्तकांच्या गावाचं भिलारमध्ये उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारी पहिले वाचक भेटले थेट देशाचे माजी केंद्रीयमंत्रीच. या अनोख्या प्रकल्पाच्या भेटीसाठी मोठ्या कौतुकाने गावात आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनेक दुर्मीळ पुस्तकं चाळली.अस्सल राजकारणी म्हणून पवारांची ओळख असली तरी साहित्य क्षेत्रातील कलंदर रसिक म्हणूनही त्यांची साहित्यिकांमध्ये ख्याती आहे. सतत नवनवीन पुस्तके वाचण्याचा छंद असणारे शरद पवार जेव्हा शुक्रवारी भिलार गावात आले, तेव्हा सर्वच ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला. पवार कुटुंबीयातील इतरही सदस्य त्यांच्या सोबत होते.सर्व प्रथम गावच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या घरातील वाचनालयाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर बाळासाहेब भिलारे यांच्या घरीही जाऊन बुकशेल्फमधील अनेक दुर्मीळ पुस्तकांची पाहणी केली. विशेष करून एक शिवचरित्र त्यांनी बराच वेळ चाळले. सध्या त्यांचा मुक्काम याच परिसरात असून, शनिवारीही ते भिलारमधील नवनव्या पुस्तकांचा लाभ घेणार आहेत.देशातल्या या पहिल्या अनोख्या गावाला भेट देण्याची खूप इच्छा होती. त्या ओढीनेच मी इथे आलो असून, अनेक चांगली अन् नवनवीन पुस्तके वाचायलाही मिळाली.- शरद पवार
पुस्तकांच्या गावाला शरद पवारांच्या रुपात पहिले वाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2017 11:13 PM