डोंबिवली : डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दालनात कोणत्याही स्टॉलला प्रथम भेट देणाऱ्या वाचकाला प्रकाशक एक पुस्तक भेट देणार आहेत. ३१२ वाचकांना हा मान मिळेल. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात हा पायंडा पडणार आहे.साहित्य संमेलनासाठी ग्रंथ दालनाच्या शुक्रवारी काढलेल्या सोडतीत ३१२ प्रकाशन संस्थांना स्टॉलचे वाटप करण्यात आले. या दालनासाठी प्रकाशकांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यामुळे स्टॉल वाटपाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. यावेळी साहित्य महामंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, ‘अक्षरधारा’चे रमेश राठीवडेकर आदी उपस्थित होते. प्रकाशकांनी त्यांच्या गरजेनुसार एकापेक्षा अधिक स्टॉलची मागणी नोंदवली होती. चिठ्ठ्या टाकून सॅलचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सलग स्टॉल मिळालेले नाहीत. मात्र प्रक्रिया पारदर्शक असल्याने प्रकाशकांनी समाधान व्यक्त केले. स्टॉलचा पहिला मान चिपळूणच्या अंजली प्रकाशन संस्थेला मिळाला. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, राज्य सरकारचा साहित्य व प्रकाशन विभाग, हस्तकला, आदिवासी कलाकृती, फूड कोर्ट, साहित्याशी संबंधित सीडी यांनाही स्टॉल दिले जाणार आहेत. त्यामुळे स्टॉल्सचा आकडा ४०० पेक्षा अधिक असेल. जागेचा विचार करुन ही रचना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>यापूर्वी संमेलनाच्या उद््घाटनानंतर स्टॉल दिले जात. त्यामुळे मांडामांड होईपर्यंत दिवस संपून जाई. यंदा त्यात बदल केला असून स्टॉलचा ताबा १ जानेवारीला दिला जाईल. त्यामुळे ग्रंथदिंडीचा समारोप होताच ग्रंथ दालन खुले होईल. एका स्टॉल्ससाठी सहा हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. ते मागील साहित्य संमेलनाच्या तुलनेत जास्त असल्याचे प्रकाशकांनी सांगितले.
पहिल्या वाचकाला मिळणार पुस्तक
By admin | Published: January 21, 2017 3:59 AM