ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - पाच हजार वर्षांपासून देशात चालत आलेल्या आरक्षणाच्या व्यवस्थेला माझा विरोध आहे. कपडे धुणारे, मैला वाहणारे आणि चर्मकार या गोष्टी एकाच समाजाने करायच्या, पूजा मात्र विशिष्ट समाजानेच करायची, आधी हे आरक्षण रद्द करा मग इतर आरक्षणाकडे आपण वळू, असं यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार म्हणाल्या आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, संजय निरुपम, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सपाचे अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, आदी नेते उपस्थित होते. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र आणि मुंबईत येऊन मला आनंद वाटतोय. महाराष्ट्राची स्वतःची महान परंपरा आहे. स्वातंत्र्य आंदोलन आणि त्यानंतर राष्ट्र उभारणीत महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र विकासाच्या शिखरावर पोहचावे ही माझी कामना आहे. 17 विरोधी पक्षांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केले. ही विरोधी पक्षांची एकजूट मूल्य आणि तत्त्वांवर आधारित आहे. दलित विरुद्ध दलित अशी लढाई बनली आहे. आजवर जेव्हा उच्चवर्णीय उमेदवार होते, तेव्हा त्यांच्या गुणाची, अनुभवाची चर्चा झाली. या निवडणुकीत कोविंदजी आणि मी निवडणुकीत उभे आहोत तर फक्त आमच्या जातीची चर्चा होत आहे, ही बाब योग्य नाही.
आधी "ही" आरक्षणं तर बंद करा- मीरा कुमार
By admin | Published: June 30, 2017 7:04 PM