ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका शोभा डे यांनी तब्येतीवरुन खिल्ली उडवलेले पोलीस अधिकारी दौलतराम जोगावत यांच्यावर गुरुवारी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शोभा डे यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवलेल्या मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांच्यावर या आठवड्यात उपचारास सुरुवात झाली.
महापालिका निवडणूक मतदानावेळी शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो ट्विटरवर शेअर करून ‘मुंबईत हेवी बंदोबस्त’ अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. शोभा डे यांनी उडवलेली खिल्ली मात्र जोगावत यांच्यासाठी फायद्याची ठरली असंच म्हणावं लागेल. वजन कमी करण्याचा निर्णय घेऊन दौलतराम उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यावर चर्नी रोडवरील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी डॉ. लकडावाला आणि त्यांच्या टीमने दौलतराम यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया केली. दौलतराम यांचं सध्या वजन 180 किलो असून, त्यांच्यावर उपचार करुन वजन 80 ते 100 किलोच्या आसपास आणण्याचे डॉक्टरांचे लक्ष्य आहे.
दरम्यान, शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. १९९३ पर्यंत माझी प्रकृती सर्वसाधारण होती, पण पित्ताशयाचा आजार बळावल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढले आणि वजन वाढत गेले, असे दौलतराम यांनी म्हटले आहे.
उपचारांचा खर्च द्या
शोभा डे यांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना जोगावत यांनी, ‘अति खाण्यामुळे माझे वजन वाढलेले नाहीये,’ असे म्हणत, ‘बारीक होणे कुणाला आवडत नाही?’ असेही म्हटले होते. शिवाय, ‘मॅडमने माझ्या उपचारांचा खर्च द्यावा,’ असा टोलाही जोगावत यांनी डे यांना लगावला होता.