मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी नोंद असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदवर मंगळवारी लेप्रोस्कोपिक स्लिव्ह ग्रॅस्ट्रिक्टोमी सर्जरी करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटावरील त्वचेचा अतिरिक्त भाग काढून टाकला जातो. शस्त्रक्रियेनंतर इमानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.इमानच्या पहिल्या शस्त्रक्रियेसाठी तिचे वजन कमी करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यापासून इमानचे शस्त्रक्रियेविना १२० किलो वजन घटले. इजिप्तहून बेरिएॅट्रिक सर्जरीसाठी भारतात दाखल झालेल्या ३६ वर्षीय इमानचे वजन आता ३८० किलोएवढे आहे. इमान गेली कित्येक केवळ ३ ते ४ तास झोपायची, मात्र मुंबईत दाखल झाल्यावर सातत्याने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर ती आठ तास झोपते. इमानला सकाळी ७.३० वाजता उठविले जाते, त्यानंतर दर दोन तासांनी तिला द्रवरूपात आहार दिला जातो. शिवाय, केवळ प्रोटिन्स आणि हायफायबर दिले जात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर दिवशी केवळ १२०० कॅलरीजचे तिला पथ्य पाळावे लागते. डॉ. लकडावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता इमान स्वत: बसू लागली आहे. येत्या काही काळात ती स्वत:च्या पायांवर उभी राहू शकेल अशी आशा आहे. दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर २५ दिवसांत इमानचे आणखी ५० किलो वजन कमी होईल. (प्रतिनिधी)- इमान पूर्णपणे तिच्या कुटुंबीयांवर अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी यांच्याकडे वैद्यकीय साहाय्य मागितले होते. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितल्यानंतर इमान पहिल्यांदा क्रेनच्या साहाय्याने घराबाहेर पडली.
इमानवर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 2:17 AM