ऑनलाइन लोकमत
दावडी, दि.09 - देशाला स्वातंत्र्य मिळालं, गावागावात रस्ते आले आणि वीजही. परंतु पुण्यात आजही असे एक गाव आहे जिथे स्वातंत्र्यानंतरही कधी एसटीच पोहोचली नव्हती. मात्र आज इतक्या वर्षानंतर गावात एसटी आली आणि साऱ्या गावाने एसटीचे मनापासून उत्साहात स्वागत केले आणि आनंदोत्सव केला. आज सकाळी अकरा वाजता पहिल्यांदा गावात एसटी आली. ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी जल्लोष करुन टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. चालक व वाहक यांना महिलांनी औक्षण केले. एसटी बससमोर ग्रामस्थांनी खंडोबा देवाची तळी भरुन या एसटी बसची पुजा केली. आता दिवसभरात खेड ते खरपुडी सकाळ व संध्याकाळ एसटीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द नावाचं हे गाव. खेड सारख्या प्रगतीशील तालुक्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावरचं. गावाची लोकसंख्याही बाराशेच्या आसपास. गावात प्रती जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं एक खंडोबाचं मंदिरही. खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येतात. परंतु आजतागायत गावातल्या कुणालाही एसटीची सुविधा नव्हती. खरपुडी खुर्द (ता. खेड) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस आली. गावात एसटी आल्यामुळे ग्रामस्थांनी मोठया उत्साहात एसटीचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.ग्रामस्थ, महिला, जेष्ठ नागरिक, वृध्द व विद्यार्थी अशा साऱ्यांनाच जवळच्या शिरोली फाटा किंवा नदीपालिकडील खरपुडी बुद्रुक येथे जायचे असेल तर चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट ठरलेली. ती अंगवळणीही पडलेली. खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एसटी बस व इतर वाहनांची सोय नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत राहायची. गावाला एसटी बस सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांनी गेले कित्येक वर्षांपासून मागणी होती. खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे माजी अध्यक्ष संदिप गाडे, मल्हारी काळे व ग्रामस्थांनी राजगुरुनगर बसस्थानक प्रमूखाकडे याबाबत पाठपुरावाही केला होता. खरपुडी, ठाकरवस्ती, काळेवस्ती, मलघेवस्ती, शिरोली फाटा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना या एसटी बसमुळे प्रवास सुलभ होणार आहे. यावेळी सरपंच अनिता गाडे, उपसरपंच बंडोपंत गाडे, संदिप गाडे, खंडोबा देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष सोपान गाडे, माणिकशेठ गाडे, हिराबाई काळे, गणेश गाडे, सुप्रिया गाडे, मिनाक्षी खंडागळे, सुदाम गाडे, धोडिभाऊ गाडे, कांताराम शिंदे, हिरामण मलघे, बाळासाहेब माकर, संभाजी गाडे, मुरलीधर गाडे आदी उपस्थित होते.