ऑनलाइन लोकमत
सोनई (अहमदनगर), दि. ११- शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी इतिहासात पहिल्यांदाच महिलेची निवड झाली असून अनिता शेटे यांना हा मान मिळाला आहे. तर नानासाहेब बनकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी इतिहासात पहिल्यांदाच १० महिलांसह तब्बल ९७ जणांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केले होते, अखेर आज या पदासाठी एका महिलेची निवड झाली असून हा अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे. ११ नवनियुक्त विश्वस्तांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली.
गेल्या महिन्यातच एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनी देवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर मोठा गदारोळ माजला, शुद्धीकरणासाठी गावक-यांनी देवाला दुग्धाभिषेक घातल्याची घटनाही घडली. त्याच शनी शिंगणापुरात आज एका महिलेकडे विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद येणे ही इतिहासातील प्रथमच घडलेली व क्रांतिकारी घटना असून आता शनी मंदिर महिलांना खुले होऊ शकेल.