ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 1 - घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असेल तर वारंवार कोर्टाच्या पाय-या चढायला लागणं काही नवं नाही. मात्र पुणे दिवाणी न्यायालयाने ही जुनी परंपरा मोडीत काढत पहिल्यांदाच याप्रकरणी ऑनलाइन सुनावणी घेत स्काईपचा वापर करण्यास परवानगी दिली. घटस्फोटासाठी अर्ज करणा-या महिलेला स्काईपवरुन आपली बाजू मांडण्याची परवानगी न्यायालयाने दिली. इतकंच नाही तर यानंतर न्यायालयाने घटस्फोटासाठी मंजूरीही दिली. अशाप्रकारे स्काईपच्या माध्यमातून घटस्फोट मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.
या दांपत्याने एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. शनिवारी पती सुनावणीला हजर राहण्यासाठी सिंगापूरहून भारतात आला. मात्र वैयक्तिक कारणांमुळे पत्नीला लंडनहून येणं शक्य नव्हतं. यावेळी न्यायालयाने जुन्या पंरपरेप्रमाणे पुढची तारीख न देता नेहमीपेक्षा वेगळा निर्णय देत स्काईपवरुन हजर राहत आपली बाजू मांडण्याची परवनागी दिली.
दांपत्याने प्रेमविवाह केला होता. एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2015 रोजी अमरावतीत लग्न केल्यानंतर दोघेही पुण्याला शिफ्ट झाले. हिंजवडीत वेगवेगळ्या कंपनीत दोघं काम करत होते. महिन्याभरानंतर दोघांनाही परदेशी जाण्याची संधी मिळाली. पतीला सिंगापूर तर पत्नीला लंडनमध्ये जाण्याची ऑफर होती. पती सिंगापूरला निघून गेला, मात्र पत्नीला मागेच थांबावे लागले. आपलं लग्न करिअरमध्ये अडथळा ठरु लागल्याचं तिने अर्जात सांगितलं होतं.
यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. त्यावेळी त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांच्या सहमीतने दोघांनी 2016 रोजी घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर महिला पुन्हा लंडनला निघून गेली. वकिलाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी व्हावी अशी विनंती केली असता न्यायालयाने ती मान्य केली. पती न्यायालयात उपस्थित असताना पत्नी स्काईपच्या माध्यमातून आपली बाजू मांडत होती. अखेर न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला.