लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपावर यशस्वी तोडगा निघाल्यानंतरच संप मागे घेण्यात आला. १५ वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट चर्चा करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवित असल्याने व आश्वासक योजना राबवित असल्याने समितीच्या सदस्यांनी संप मागे घेतला, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. राज्य सरकार शेतीमध्ये अनेक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. आधीच्या सरकारने थकविलेले ठिबक सिंचनाचे अनुदान आम्ही दिले. नाबार्ड अंतर्गत ऊस उत्पादकांना ठिंबक सिंचनासाठी केवळ २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जात आहे. बाकी व्याज सरकार भरणार आहे. सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाणार आहे, असे खोत यांनी सांगितले. अपघात विम्यापोटी साडेचार लाख शेतकऱ्यांना आरोग्य सहाय्यता निधीतून ६०० कोटी रुपये दिले. जिल्हावार आढावा घेऊन कर्जमाफीत दुष्काळी भाग व आत्महत्याग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहोत, असे ते म्हणाले.मग परदेशात चर्चा करणार का?सरकार संवेदनशील असल्यानेच शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मात्र, काही घटक लोकांच्या मनात द्वेष पसरवित आहेत. राज्यात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा का केली, असे ते विचारतात. मग चर्चा करण्यास ते परदेशात जाणार आहेत का, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रश्न केला.विदर्भ, मराठवाड्यासाठी स्वतंत्र योजनाविदर्भातील ६, मराठवाड्यातील ८ व खान्देशातील एक अशा १५ जिल्ह्यांत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी ही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून ५ हजार कोटींची योजना सरकार राबवित आहे. त्यात सिंचनापासून अनेक सुविधांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांशी १५ वर्षांत पहिल्यांदाच थेट चर्चा
By admin | Published: June 05, 2017 4:58 AM