मुंबई : वाढत्या वाहनांच्या संख्येने मुंबईत वाहनतळाची समस्या, वाहतूककोंडी आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आणले आहे़ त्यामुळे ‘सायकल टू वर्क’ला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंग उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना पालिकेने आणली आहे़ पहिल्या प्रयोगात कुलाबा, चर्चगेट, फोर्ट या विभागातील ४७ वाहनतळांवर एकूण ४७० सायकलींच्या पार्किंगची सोय असणार आहे़हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट ही सर्वाधिक वर्दळीची ठिकाणं आहेत़ येथील ४७ वाहनतळांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पे अॅण्ड पार्कच्या देखभालीकरिता पालिकेने निविदा मागविल्या आहेत़ या ४७ वाहनतळांवर पाच हजार ६५० चारचाकी आणि दोन हजार ५४७ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे़ निविदेमध्ये तसा समावेश करून ही पार्किंग सायकलस्वारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ या वाहनतळाच्या माध्यमातून दरमहा एक कोटी १४ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे़ सरकारी व खाजगी कार्यालयांमुळे अतिवर्दळीचा व उच्चभ्रू ठरलेल्या या विभागामध्ये ४७ वाहनतळ आहेत़ या वाहनतळांमध्ये आठ हजार १९७ वाहनांचे पार्किंग शक्य आहे़ (प्रतिनिधी)
मुंबईत पहिल्यांदाच मोफत सायकल पार्किंग
By admin | Published: July 15, 2016 3:25 AM